`राज.रण.नीती?'चे मनसेकडून `परीनिरीक्षण'
लोकसत्ता- प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरुद्ध सुरू केलेल्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्याराजकीय दहशतीचे सावट आता महाविद्यालयीन स्तरावरील प्रतिष्ठेच्या आयएनटी एकांकिका स्पर्धेवरही उमटत आहे. कीर्ती एम. डुंगरसी महाविद्यालयाच्या `राज.रण.नीती?' या नीलेश कदम आणि विनित मराठे लिखित एकांकिकेमुळे गेला आठवडाभर कीर्ती महाविद्यालय आणि आयएनटीच्या आयोजकांनी धास्ती घेतली आहे. या एकांकिकेच्या नावात `राज' असल्यामुळे मनसेने या एकांकिकेची पडताळणी केल्याचे समजते.आयएनटी एकांकिका स्पर्धेची पूर्वप्राथमिक फेरी सुरू झाली आहे. मात्र `राज.रण.नीती?' या एकांकिकेच्या नावामुळे वातावरणात चांगलाच धुरळा उडाल्यामुळे मनसेने त्यांच्यापरीनेही या एकांकिकेचे `परीनिरीक्षण' केल्याची चर्चा महाविद्यालयीन वर्तुळात आहे. राज यांच्यासंदर्भात या एकांकिकेत काही नसल्याची शहानिशा करून मनसेनेही या एकांकिकेला हिरवा कंदील दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. आता १७ सप्टेंबर रोजी ही एकांकिका पूर्वप्राथमिक फेरीत सादर होणार आहे.या एकांकिकेबाबत रंगभूमी परीनिरीक्षण मंडळाचीही थोडीफार गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. या एकांकिकेच्या नावात `राज' असल्यामुळे रंगभूमी परीनिरीक्षण मंडळाची `वक्रदृष्टी' झाली. परंतु आता रंगभूमी परीनिरीक्षण मंडळाने एकांकिकेला हिरवा कंदील दिला आहे.अस्थान नगर नावाच्या गावाची कथा `राज.रण.नीती?' या एकांकिकेत साकारली आहे. सैनिक युद्धभूमीवर जाताना रणनीती आखतो आणि राजा कूट राजनीती खेळतो. या विषयावर ही एकांकिका आधारित आहे. बाकी वादग्रस्त असे काहीच नसल्याची स्पष्टोक्ती एकांकिकेचे लेखक आणि दिग्दर्शक नीलेश कदम यांनी दिली आहे.