आयएनटीचा आजचा दिवस गाजला तो गर्दीच्या एकांकिकांमुळे, “मॉब प्ले”च्या मार्याने आज चव्हाण सेंटरचा परिसर दुमदुमून गेला होता.
आज महर्षि दयानंद ८५, कीर्ति कॉलेज ६०,भवन्स चौपाटी ४०,साठ्ये ४५,पाटकर ३६,चेतना ३० या बहुसंख्येने विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले. आज सगळ्याच्या सगळ्या दहा एकांकिका सादर झाल्या.
स्पर्धकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
नाटक म्हणजे काय ? एकांकिका कशाला म्हणतात ? याचा पताही नसलेली अनेक अकरावीतली मुले आज मॉब मध्ये दिसली समोर बसलेल्या दोन सरांना नाटक करून दाखवायचे आहे बाकी मोठे दादा ताई काय भन्नाट काम करतात हा त्यांच्या चेहर्यावरचा निरागस भाव शब्दात पकड़ता येत नाही.
उद्याची ही पिढी नाटक करेल की माहित नाही पण एक प्रेक्षक म्हणुन या मुलांची भर मराठी नाट्य सृष्टित पडली आहे ,हे नक्की.
अलीकडे हजारो रुपयांची बक्षिस लावुनही स्पर्धक मिळत नाहीत. कोणतेही अपेक्षा नसलेला हा केवळ कॉलेज साठी धडपडणारा समूह लाखो रुपये देवून ही निर्माण करता येणार नाही हेच या स्पर्धेच वैशिष्ट्य आहे .
रंगमचाचा स्पर्श झालेली ही पिढी पहाताना मिठीबाईत पहिल्यांदा जमिनीवर नमस्कारासाठी टेकवलेला हात, उदय म्हैसकर सरांचे आशीर्वाद पुन्हा जिवंत झाले समोरच्या मुलात माझा मी दिसून गेला पण आज हे सांगायला उदय सर आमच्यात नाहीत.
त्यांच्या जगण्याचीच झालेली एकांकिका आज ही अस्वस्थ करते.
नाटकवाला म्हणजे व्यसन हे समीकरण आज ही बदलेले नाही,”परफॉर्मेंस नंतर आता बसायला जाऊ” हे एका मुलाचे शब्द त्या अस्वस्थतेत अधिकच भर टाकून गेले.
नाटका बाहेरच नाटक आता तरी बदलेल का ?