मुंबईत सध्या गणेशोत्सवाचा माहोल असला तरी महाविद्यालयांतील नाटयमंडळे मात्र जोरदार कामाला लागली आहेत. येत्या १५ सप्टेंबर रोजी कै. प्रवीण जोशी अर्थात आयएनटी एकांकिका स्पर्धा सुरू होत आहे. यंदा आयएनटी स्पर्धेमध्ये मुंबईतील ४८ महाविद्यालये सहभागी झाली आहेत. या स्पर्धेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट होती. त्या दिवशी रात्री १० वाजेपर्यंत आयएनटीचे कार्यालय सुरू होते. अगदी कार्यालय बंद होईपर्यंत विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी एकांकिकांविषयीची विस्तृत माहिती भरलेले अर्ज आयएनटी कार्यालयात सादर केले. या स्पर्धेची प्राथमिक फेरी १५ ते २० सप्टेंबरदरम्यान पार पडणार आहे. दुसरी फेरी २३ ते २६ सप्टेंबर आणि अंतिम फेरी ३० सप्टेंबर रोजी होणार आहे. या तीनही फेऱ्या नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित करण्यात आल्या आहेत.
आयएनटीच्या आयोजकांनी यंदा स्पर्धेच्या नियमात थोडे बदल केले आहेत. नेपथ्य, प्रकाशयोजनेसह एकांकिका सादर करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाला एक तासाचा अवधी देण्यात येणार आहे. नाटयगृहाची उपलब्धता आणि वेळेचे गणित जमवून आणण्यासाठी आयोजकांतर्फे हे पाऊल उचलण्यात आले आहे. या नियमाचे बहुतेक रंगकर्मींतर्फे स्वागत करण्यात आले आहे तर या नियमामुळे दिग्दर्शकांच्या नाटयप्रतिभेवर बंधने येतील या मुद्यावर काहींनी या नियमाला विरोध दर्शवला आहे. हा कालावधी एक तासाऐवजी किमान सव्वा तासाचा असावा, असा सूर काही दिग्दर्शकांनी लावला आहे. एकांकिका स्पर्धांमधांमध्ये सातत्याने सहभागी होणाऱ्या लेखक-दिग्दर्शकांच्या या काही प्रतिक्रिया.
एकांकिका स्पर्धेवर वेळेचे बंधन घालणे गरजेचे होते. पण एकांकिका सादर करावयाच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी ६० ऐवजी ७० किंवा ७५ मिनिटे दिली असती तर आÆधक योग्य झाले असते, असे मत रुईया महाविद्यालयाची एकांकिका बसविणारा विशाल मोरे याने व्यक्त केले आहे. दरवर्षी काही जणांकडून वेळेचा दुरुपयोग होतो. परंतु काही एकांकिकांद्वारे विशेष असे नेपथ्य दिसून येते, तसे न दिसता यंदाच्या वर्षी बहुतेक `सजेस्टिव्ह' नेपथ्य म्हणजेच तीन `लेव्हल' लावून एकांकिका करण्यावर भर असेल, असे विशाल म्हणाला.
गेल्या वर्षीच्या `अस्वस्थ अपूर्णांकाचे पडघम' या एकांकिकेचे लेखक-दिग्दर्शक भालचंद्र कुबल म्हणाले की, आयएनटी एकांकिका स्पर्धा हे `अॅमॅच्युअर थिएटर' आहे. मोजके नेपथ्य आणि मोजकी प्रकाशयोजना करूनही चांगली एकांकिका बसवता येऊ शकते. कारण मुळात नाटकासाठी नेपथ्य करायचे असते की नेपथ्यासाठी नाटक हे आधी प्रत्येकाने मनाशी पक्के केले पाहिजे. आयएनटीसारख्या स्पर्धांमधून महाविद्यालयाची सांघिक कामगिरी, लेखक-दिग्दर्शक-कलाकारांची सृजनशीलता तपासली जाते. त्यामुळे एक तासाचा वेळ एकांकिकेसाठी पुरेसा आहे, असे कुबल यांचे मत आहे.
या नियमामुळे सृजनशीलतेवर थोडीफार बंधने येणारच आहेत. तरीही एका तासात एकांकिका सादर करता येईल. या बंधनांचा एकांकिकेच्या कालावधीवर नक्कीच परिणाम होईल. चाळीस ऐवजी ३२ ते ३५ मिनिटांत एकांंकिका आटोपती घ्यावी लागेल. एखाद्या चांगल्या एकांकिकेला एक तास पाच मिनिटे लागली आणि आयोजक या नियमांबाबत खूपच कडक राहिले तर तर ती एकांकिका बाद होण्याची शक्यता आहे, असे प्रमोद शेलार म्हणाले.
आयएनटीमध्ये सादर होणाऱ्या लार्जर दॅन लाईफ एकांकिकांमुळे आयएनटीची वेगळी आयडेंटीटी तयार झालेली आहे. एक तासाचा नियम घातल्यामुळे दिग्दर्शकांच्या स्वातंत्र्यावर नक्कीच परिणाम होईल. आयएनटीमध्ये सादर होणाऱ्या एकांकिकांची पातळी घसरत चालल्याची चर्चा नाटय वर्तुळात होत आहे. या नियमामुळे ती आणखी घसरत जाईल. `नाथ पै' एकांकिका स्पर्धेलाही वेळेची अट असते पण त्या ठिकाणी ७० मिनिटांचा अवधी दिलेला असतो. त्यामुळे निभावून नेता येऊ शकते. पण ६० मिनिटात मात्र हे काम खूप अवघड होऊन बसेल, अशी प्रतिक्रिया समीर सुर्वे यांनी व्यक्त केली आहे.
हा नियम म्हणजे महाविद्यालयांसाठी एक आव्हान आहे. काही महाविद्यालये नेपथ्य आणि प्रकाशयोजनांसाठी अर्धा किंवा पाऊण तास वेळ खर्ची घालतात. त्यामुळे एकांकिका लांबत जाते. स्पर्धा संपायला खूप रात्र झाली तर स्पर्धकांना आपापल्या निवासस्थानी पोहोचण्यास उशीर होतो. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. आयएनटी स्पर्धेतील बदललेला नियम हासुद्धा एक प्रयोगच आहे.
या वर्षी स्पर्धक कशा प्रकारे प्रतिसाद देतात हे पाहिले जाईल. त्यानंतर पुढील वर्षी हा नियम कायम ठेवायचा की त्यात काही बदल करायचे हे ठरविण्यात येईल, असे आयएनटीचे आयोजक अजित भुरे यांनी सांगितले.